
राज्यातील बहुतांश शेती ही अजूनही पावसावर अवलंबून आहे. पावसाचा लहरीपणा, कधी पडणारा दुष्काळ तर कधी ओसंडून वाहणारा पुर, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही अनिश्चित असते. याच पार्श्वभूमीवर शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – वैयक्तिक शेततळे (मागेल त्याला शेततळे) ही खरंच कोरडवाहू भागासाठी आशेचा किरण ठरते आहे..
योजनेचा उद्देश काय?
या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातच सिंचनासाठी पाण्याचा शाश्वत स्रोत उपलब्ध करून देणे. पावसाचे पाणी शेततळ्यात साठवून वर्षभर वापरण्यायोग्य करणे, हे या योजनेतून शक्य होते. त्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते, आणि शेती फायदेशीर बनते.
योजनेसाठी किती निधी उपलब्ध आहे?
सन 2023-24 मध्ये या योजनेसाठी शासनाकडून 80 कोटी रुपये निधी मंजूर झाला होता. यामधून 7,316 शेततळ्यांसाठी 50.81 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. याशिवाय 1,665 शेतकऱ्यांची अनुदान प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय आणखी 20 कोटी रुपये अलीकडेच या योजनेसाठी मंजूर झाले आहेत.
किती अनुदान मिळते?
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे खोदकामासाठी 75,000 रुपये आणि प्लास्टिक अस्तरीकरणासाठी स्वतंत्रपणे 75,000 रुपये इतके अनुदान मिळू शकते. म्हणजेच एकूण 1.5 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
शेततळ्याचा आकार 15x15x3 मीटर ते 34x34x3 मीटर पर्यंत असू शकतो. शेततळ्याचा प्रकार आणि आकारानुसार 14,433 रुपये ते 75,000 रुपये पर्यंत अनुदान दिले जाते.
कोण पात्र आहे?
- अर्जदार शेतकऱ्याच्या नावावर किमान 0.60 हेक्टर जमीन असावी.
- जमीन तांत्रिकदृष्ट्या शेततळ्यासाठी योग्य असावी.
- अर्जदाराने यापूर्वी इतर कोणत्याही योजनेतून शेततळ्यासाठी अनुदान घेतले नसावे.
अर्ज कसा करावा?
- अर्ज महा डीबीटी पोर्टल वर करावा लागतो.
- अर्ज करताना आधार प्रमाणीकरण, 7/12, 8अ उतारा, बँक पासबुक, जातीचा दाखला, हमीपत्र ही कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
- अर्ज शुल्क 23.60 रुपये आहे.
- अर्जाची प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन आणि पारदर्शक पद्धतीने केली जाते.
- लाभार्थ्यांची निवड संगणकीय सोडतीच्या माध्यमातून होते.
काही महत्त्वाच्या अटी
- शेततळ्याचे काम तीन महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक आहे.
- कृषि सहाय्यकांनी दाखवलेल्या जागेवरच तळे करणे आवश्यक आहे.
- कोणतेही आगाऊ पैसे मिळत नाहीत.
- 75 हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च शेतकऱ्यांने स्वत: करायचा असतो.
- शेततळ्याच्या आजूबाजूला स्थानिक झाडे लावावी लागतात.
- तळ्याची देखभाल लाभार्थ्याने स्वत: करावी.
शेततळ्यासाठी योग्य जागा कशी निवडाल?
- कमी पाझराची जमीन असावी.
- पाणलोट क्षेत्र जलपरिपूर्ण असावे.
- तीन टक्क्यांपेक्षा कमी उताराची जमीन योग्य.
- टंचाईग्रस्त गावांना प्राधान्य दिले जाते.
- मुरमाड, वालुकामय, चिबड, दलदलीची जमीन टाळावी.
निष्कर्ष
‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी एक अमृततुल्य संधी आहे. सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यामुळे पिकांची हमी मिळते, उत्पादन वाढते आणि शेती नफा देणारी होते. सरकारकडून मिळणारे अनुदान ही मोठी मदत ठरते.
जर तुम्हालाही तुमच्या शेतात शाश्वत सिंचनाची सोय करायची असेल, तर ही योजना तुमच्यासाठीच आहे!
आजच महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करा आणि तुमच्या शेतीसाठी टाकतं पाणी साठवा!
✍️ लेखक – तालुका कृषी अधिकारी कार्यालय ,करमाळा
🟢 अधिक माहितीसाठी संपर्क – आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय.
