
मागील आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाकडे सुरुवात केली होती. या निमित्ताने तालुक्यात पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मोठ्या प्रमाणावर निर्मल उडीद या बियाणांसाठी मागणी असल्याने याचा तुटवडा तालुक्यात सर्वत्र जाणवत आहे. तर यासाठी झुंबड उडालेली दिसून आल्यानंतर स्वतः कृषी अधिकारी यांना दुकानांत जाऊन नियोजनबद्ध वाटप करावे लागले. शेतकऱ्यांनी आंबट वापस्यावरच पेरणीला सुरुवात केली होती. परंतु यासाठी बियाणांची मागणी वाढली व शेतकऱ्यांना बियाणे मिळणे अवघड होऊन बसले. इतर कंपनीचे बियाणे उपलब्ध असतानाही बऱ्याच शेतकऱ्यांची निर्मल उडीदाची मागणी असल्याचे दिसून येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आज रांगा लावलेल्या होत्या.

करमाळा शहरातील विजया अॅग्रो तसेच महेश अॅग्रो या ठिकाणी उडीद उपलब्ध असल्याची माहिती झाल्यानंतर शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती. यावेळी स्वतः कृषी अधिकारी देवराव चव्हाण यांनी दुकानात बसून सदर बियाणांची विक्री रीतसर प्रक्रिया पार पाडली.

या वेळी दुकानदारांना वैयक्तिक सर्वांना फोन करूनही कृषी अधिकारी सूचना, इशारे देत असल्याचे दिसून आले.शनिवारी तब्बल ५०० पेक्षा जास्त पिशव्यांची विक्री झाली असून, अजूनही निर्मल उडीदला मागणी आहे. तर इतर कंपन्यांचे उडीद अजूनही स्टॉकमध्ये असल्याने उडीदाचा तुटवडा नसल्याचे दिसून येते. परंतु केवळ एकाच कंपनीची मागणी अधिक असल्याने त्याचा तुटवडा भासत आहे. तसेच त्याचा गैरफायदा घेऊन काही लोक लिंकिंग तर मोठ्या दरात विक्री करू लागले होते, अशी माहिती मिळाल्यानंतर स्वतः चव्हाण यांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत.